Friday, March 4, 2011

'अमानुष' माणूस

  बऱ्याच जणांचा असा (गैर)समज आहे की आमचा इव्हान माणूस आहे! वेल्ल, इव्हान म्हणजे माझ्या बाजुच्या संगणकावर माझ्याप्रमाणे चवऱ्या ढाळणारा कानी कपाळी निटस असलेला, दोन हात दोन पाय एक डोके असा वरकरणी माणसासारखा दिसणारा एक अ-माणूस! तो मूळचा युक्रेनचा पण रशियन वंशाचा आणि आमच्याच लॅब मध्ये पी.एचडी करणारा विद्यार्थी! लोकांना तर तो माणुसच वाटतो, पण मला विचाराल तर तो रशियाच्या कुठल्याशा अतिगुप्त संघटनेनं अतिअतिगुप्त प्रयोगाअंतर्गत बनवलेला, हुबेहूब माणुस दिसणारा एक रोबो आहे! अहो खरेच! (कृपया रजनीकांतशी काहीही संबंध जोडू नये!)

  मी सुरवातीला त्याला भेटलो तेव्हा मी इथे नविन होतो आणि 'कोणी घर देता का घर' असा प्रश्न घेऊन गावभर फिरत होतो. तेव्हा एक घर बघण्यासाठी इव्हान बरोबर जाण्याचा योग आला!
"आपण ४ नंबर बसनं १०:४५ ला निघू, १०:५२ ला रस्ता नं १०७ वर उतरु. तिथुन चालत आपल्याला ९ मिनिटं लागतील  म्हणजे आपण ११:०१ ला घरी पोचू; पण हे बसवाले कधिकधी उशिर करतात त्यामुळे आपण त्या घरमालकाला ११:०३ ची वेळ सांगू!" मी आवाक! काळ सांगायची वेळ जेव्हा येते तेव्हा तासाचे 'साधारण' चार भाग करुन त्यांना सव्वा-साडे-पावणे आणि तास अश्या नावाने संबोधायची मला सवय! तासाचे साठ भाग करुन खरंच ते वापरायचे असतात हे आमच्या गावीही नाही! मला जर कुणी सांगितले की मी तुझ्याकडे ११:०३ ला पोचतो तर ११:०३ घड्याळात कसे दिसतात ह्याचा हिशोब लावेतो तो सद्गृहस्थ दारी अवतरलासुद्धा असता! तर तेव्हा मला पहिली चुणूक आली की हा 'अमानुष' आहे! पुढे बसथांब्यावर तर अजुन कहर. मी नवा होतो तरिही मला बसा कश्या व्यवस्थित माहिती आहेत असा भाव खाण्यासाठी त्याला म्हणालो की "अरे, ही बघ ७ नंबर बस, ही पण जाईल ना तिकडे? हिनेच जावं का?". इव्हान : "नको! त्याला दोन कारणे आहेत. कारण एक: दोन्ही बस एकदमच सुटतात आणि कारण दोन: मला ७ नंबर बस आवडत नाही! २००८ सालच्या डिसेंबरमधे  ह्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लागली होती! आणि तेव्हा काही सुट्टीचा दिवसही नव्हता, बुधवार होता!" मी आवाक! महत्प्रयासाने 'तारिख काय होती रे' हा प्रश्न आवरला!  मी परत हिशोबाला बसलो! समजा पुण्यात एखाद्या पीएमटी च्या बसनं मला १३ मिनीटं वाट बघायला लावली असती आणि मी जर बसवर रुसून बसलो असतो तर मी अश्या किती बसांच्या प्रेमाला पारखे झालो असतो?! असो. पण इव्हान रोबो आहे की काय असे मला तेव्हा वाटू लागले.

 हळुहळू माझ्या रोबो-सिद्धांतावर माझी पक्की खातरजमा होऊ लागली. इव्हानचा रोज साधारण एकसारखा पेहराव असतो. एखादा टि-शर्ट आणि घोट्यापर्यंत पोचलेली जीन्स! तापमान १०.३ सेल्सिअसच्या वर असले की जीन्सच्या जागी हाफ चड्डी! तो फार हसत नाही. आमच्या सारखं 'ख्या-ख्या' करत दात काढताना तर मी त्याला कधिच पाहिलं नाहिए!  सकाळी भेटला की माझ्यापासून साडे चार फुट अंतरावरुन 'गुड मॉर्निंग' म्हणताना मानेला वरच्या बाजुला किंचीत झटका देतो आणि ओठ साधारण चार मिलिमीटर फाकवतो! बोलताना, ओठांना लिपस्टिक लावलेलं आहे आणि ते खराब होऊ नये म्हणून ओठांची फार हालचाल होणार नाही, अश्या पद्धतीत बोलतो!  तो फार तोलून-मापून आणि तांत्रिक दृष्ट्या अचूक बोलतो; ते "११:०३" वरुन वाचकांच्या ध्यानी आलेच असेल! बोलताना चेह-यावर हावभाव फारच कमी त्यामुळे तो विनोद सांगतोय का मर्तिकाची बातमी ह्याचा काही सुगावा लागत नाही!

  इव्हानला थंडी आवडते, आणि त्याच्यादृष्टीनं थंडी म्हणजे -२०सेल्सिअस पेक्षा कमी तापमान! जेव्हा तापमान -३ सेल्सिअसला पोहोचले होते तेव्हा मी इमानेइतबारे स्वतःला कपड्यांच्या ढिगामधे गुंडाळून वावरत होतो तेव्हा हा मला म्हणतोय "अरे अजुन तर हिवाळा सुरू व्हायचाय;  तू इतके का गुरफटून बसलायस? तसेही किती ऊबदार आहे आत्ता!" ... ऊबदार? हेल्लो??!!

 इव्हानचे फंडेही भारी! 'फुटबॉल किती बोर खेळ आहे! एक चेंडू इतकी सारी माणसं! मला उलटं आवडतं एक माणूस आणि खूप सारे चेंडू - बिलिअर्ड!!' (स्वाभाविकपणे मी आजपर्यंत ह्याच्या समोर क्रिकेटबद्दल बोललो नाहिए! एक चेंडू तोही अतिसुक्ष्म, इतकी सारी माणसे आणि तब्बल ५ दिवस!!)

 आमच्या ग्रुपच्या सिनियर मंडळींना दर आठवड्याला ग्रुप मधल्या पीएचडीच्या मुलामुलींच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनला बसावे लागते. इव्हान चे प्रेझेन्टेशन असले की आम्ही आधीच थोडी तयारी करून घेतो. चेहऱ्याला पाणी मारणे, त्याने मागच्या वेळी काय सांगितले होते ते आठवणे इत्यादी इत्यादी. इव्हान प्रचंड गंभीर चेहऱ्याने खोलीत प्रवेशतो. तो मुळातच सगळीकडे गंभीर मुद्रेने असतो इथे तर गंभीरतेची अनुज्ञप्ती मिळालेली! हा गडी नमनाला चमचाभारही तेल न वापरता सरळ आलेख वगैरे सादर करायला सुरवात करतो. बाजूच्या पब्लिकला (म्हणजे आम्ही बापुडे) कळतही नाही की नेमके कशाचा आलेख आहे आणि काय वरती चाललंय आणि काय खालती घसरतंय!! तो मोजून ५ स्लाईड्स दाखवतो आणि छापील कागद डोळ्यासमोर असल्याप्रमाणे आजूबाजूच्या य:कश्चित मंडळींकडे साफ दुर्लक्ष करत आपले सादरीकरण आटोपते घेतो. त्याने नोबेल पारितोषिकाच्या लायकीचे जरी संशोधन केले तरी बोलताना त्याचा एकही स्वर ना वर सरकतो ना खाली! सादरीकरण संपता संपता निम्मे इतरेजन डुलक्या काढत असतात उर्वरित  छताकडे बघत असतात किंवा खिडकीच्या बाहेर किंवा आपल्या संगणिकेत नाक खुपसून असतात!

 पण तो रोबो असल्याचा त्याला एक फायदाही आहे, तो सुपर हुशार आहे! त्याला त्याच्या कामाबद्दल विचारलेल्या कोणत्या प्रश्नांचे उत्तर येणार नाही असे घडणे फारच दुरापास्त! त्याच्याशी सापेक्षतावादाच्या सिद्धांतापासून (Theory of Relativity) ते पुंज भौतिकीच्या (Quantum Physics) सिद्धांतांवर चर्चा करणे तुफान मजेदार (आणि  आव्हानात्मक) असते. तो रशियन असल्यानं इतर रशियन माणसांप्रमाणे त्याचेही गणिताचा पाया भलताच बळकट आहे.

आणि इव्हान अरसिक आहे असेही नाही! (प्रोग्रामच तसे केले आहे हो!) तो बऱ्याच वेळा गाणी ऐकताना दिसतो (आता गाणी असतात की हाय-कमांडच्या आज्ञावली ते सांगणे कठीण). पण त्याच्या सगळ्यात आवडता छंद म्हणजे ट्रेकिंग! आम्ही तासनतास ट्रेकिंगच्या गप्पा मारत घालवले आहेत. इव्हान खूप सराईत गिर्यारोहक आहे, तो विविध संसाधने वापरून गिर्यारोहण करण्यात पटाईत आहे. ट्रेकिंग, स्कीईंग अश्याबद्दल तो भरभरून बोलतो. त्याला असे भरून बोलताना पहिले की वाटते की चला कुठेतरी 'माणुसकीचा' अंश आहे!


असा हा इव्हान! पुढं जाऊन मला जेव्हा घर मिळालं तेव्हा त्याने मला विचारले की "कुठे आहे तुझे घर?" मी सांगितले अमुक अमुक रस्ता तमुक तमुक गल्ली!
तो: "मग तुला घरी चालत जायला किती वेळ लागतो?"
मी: "अम्म, साधारण अर्धा तास!"
तो: "अर्धा तास? मला नाही वाटत.. कमी लागत असेल"
मी: "हां, असेलही! २० मिनीटं लागत असतील"
तो: "फक्त २० मिनिटं?"
माझा टोटल वैताग! वाटलं म्हणावं : 'अरे २० मिनीटं आणि ३० मिनीटं ह्याच्या मधली वेळ माझं घड्याळ दाखवत नाही रे बाबा!'. पण मी तसे काही बोललो नाही म्हटलं चला आपणही गम्म्त करावी
मी: "त्याचे काय आहे, मला साधारण २४ मिनीटं लागतात पण मी फारच कमी दिवस झाले चालत येतोय त्यामुळे खात्रीनं सांगायला पुरेसा डेटा नाहिए माझ्याकडं!!!"
तो: "ओह! हं .. बरोबर आहे तुझं"

अरे बरोबर काय आहे??? डोंबल!! मला क्षणभर त्याला गदागदा हलवून जागं करावंस वाटलं, पण मग लक्षात आलं तो माणूस थोडीच आहे झोपायला! :)
 

10 comments:

  1. हे हे मस्त. इव्हानबद्दल वाचून दिल चाहता है मधला शुभांगी कुलकर्णीचा मित्र आठवला. :ड

    ReplyDelete
  2. majaa aali wachun... shevatacha photo pan lakshanik aahe.. :)

    ReplyDelete
  3. लई भारीऽ !!
    खूप दिवसांनी खूप उत्तम लिखाण.
    आवडला.

    "अरे बरोबर काय आहे??? डोंबल!!" उत्तम आहे
    ह.ह.पु.वा.

    असो, मुद्रणाच्या चुका अगदी म्हणजे अगदीच क्षम्य!

    ReplyDelete
  4. खूप दिवस झाले आपण ब्लॉग लिहून..छान वाटलं बऱ्याच दिवसांनी पुन्हा तुमच्याकडून नेहमीसारखंच उत्तम आणि खळखळून हसवणारं काहीतरी वाचायला मिळालं. धन्यवाद आम्हाला आनंद दिल्याबद्दल...

    ReplyDelete
  5. तुमचा ब्लॉग प्रथमच वाचला. वा! खूप छान लिहिलं आहे तुम्ही. असेहि लोक असतात जगात!

    ReplyDelete
  6. डोक...सॉरी मेंदु न वापरत वाचावी असी.. मस्त...

    ReplyDelete
  7. खरच खूप मस्त!

    ReplyDelete
  8. इव्हान की शेल्डन*?

    :D

    मस्त लेख!

    (आजच या ब्लॉगचा शोध लागल्याने उशीरा प्रतिसाद देते आहे.)

    * 'द बिग बँग थिअरी' फेम

    ReplyDelete
  9. सही लिहिलंय ! :)

    ReplyDelete